Advocate General Information In Marathi
महाधिवक्ता बद्दल संपूर्ण माहिती
महाधिवक्ता म्हणजे काय ?
राज्य सरकारला वेळोवेळी कायदेविषयक बाबींसंदर्भात सल्ला देण्याकरिता राज्यपाल द्वारा नियुक्त केलेला सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजे महाधिवक्ता होय .
महाधिवक्ता राज्य सरकारचा वकील म्हणून देखील काम पाहतो . त्याला अनेक वैधानिक स्वरूपाचे कार्य पार पाडावी लागतात. त्यामुळे महाधिवक्त्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी ( सर्वोच्च कायदा अधिकारी ) म्हणून ओळखले जाते
❖ महाधिवक्ता नेमणूक
संविधानाच्या भाग - 6 ( राज्य सरकार ) मधील कलम 165 नुसार प्रत्येक राज्याकरीता महाधिवक्ता पदाची तरतूद घटनेत करण्यात आली आहे . त्यानुसार महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते
❖ महाधिवक्ता पात्रता
महाधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात येणारा व्यक्ती हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असावा . म्हणजेच उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याकरिता ज्या पात्रता आवश्यक असतात त्याच पात्रता महाधिवक्ता होण्यासाठी त्याच्या अंगी असाव्यात .
महाधिवक्ता पदाच्या पात्रता अटी खालीलप्रमाणे :
1 ) तो भारताचा नागरिक असावा .
2 ) त्याचं वय 62 वर्षापेक्षा जास्त नसावे .
3 ) त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्षे न्यायाधीश म्हणून किंवा उच्च न्यायालयात 5 वर्षे वकील म्हणून कार्य केले असावे .
Note : राज्यपालांच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असायलाच हवी ही पात्रतेची अट घटनेत नाही . कारण उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याकरिता ज्या पात्रता आवश्यक असतात त्याच पात्रता महाधिवक्ता होण्यासाठी त्याच्या अंगी असायला हव्यात अशी तरतूद घटनेत आहे .
त्यामुळे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याकरिता ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असावी अशी तरतूद घटनेत नाही . त्यामुळे महाधिवक्ता होण्यासाठीही ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असायलाच हवी अशी तरतूद घटनेत नाही
❖ महाधिवक्ता कार्यकाल
महाधिवक्ता पदाचा कार्यकाल घटनेत नमूद नाही , परंतु घटनेने त्याचे निवृत्ती वय 62 वर्षे ठरवून दिलेले आहे . याचाच अर्थ असा की, महाधिवक्ता वयाच्या 62 वर्षापर्यंत आपल्या अधिकार पदावर राहू शकतो .
❖ महाधिवक्ता शपथ
महाधिवक्त्याला पदग्रहण करण्यापूर्वी राज्यपालासमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागते . राज्यपाल महाधिवक्त्याला पदाची शपथ देतात .
❖ महाधिवक्ता राजीनामा
महाधिवक्ता मुदतपूर्व म्हणजेच वयाची 62 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आपल्या अधिकार पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देऊ शकतो
❖ महाधिवक्ता पदच्युत
महाधिवक्त्याने जर घटनाविरोधी कृत्य केले असेल किंवा अधिकार पदाचा गैरवापर केल्यास राज्यपाल त्याला केव्हाही पदच्युत करु शकतात .
❖ महाधिवक्ता वेतन
महाधिवक्त्याला दरमहा किती वेतन द्यायला हवे याबाबत घटनेत कोणतीही तरतूद नाही . परंतु महाधिवक्त्याचे वेतन निर्धारित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे त्यानुसार महाधिवक्त्याला राज्याच्या संचित निधीतून दरमहा 1,25000 रुपये वेतन दिले जाते .
महाधिवक्त्याचे विशेषाधिकार अथवा भत्ते अथवा अनुपस्थिति रजा किंवा निवृत्तिवेतन याबाबतचे त्याचे हक्क यांपैकी कशातही त्याला नुकसानकारक होईल असा बदल त्याच्या नियुक्तीनंतर केला जात नाही . परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर त्याच्या वेतनात कपात करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे .
Note - महाधिवक्त्याची नेमणूक राज्य सरकारला वेळोवेळी कायदेविषयक बाबींसंदर्भात सल्ला देण्याकरिता राज्यपालद्वारा केली असली तरी तो राज्य सरकारचा पूर्ण वेळ सल्लागार नाही . तसेच तो राज्य सरकारचा सेवकही नाही .
❖ महाधिवक्त्याचे अधिकार
1 ) शासनाकडून फर्मावण्यात येईल तेव्हा विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार - घटनेच्या कलम 177 नुसार त्याला राज्य विधीमंडळाच्या बैठकीत बोलण्याचा , भाषण करण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार आहे परंतु त्यांना मत देण्याचा अधिकार नाही
2 ) विधीमंडळाच्या ज्या समितीमध्ये त्याला सदस्य म्हणून नेमले आहे त्या कोणत्याही समितीच्या बैठकीत बोलण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार त्याला आहे . परंतु या अनुच्छेदाच्या आधारे मतदान करण्यास तो हक्कदार असणार नाही .
Note : घटनेने कलम 194 नुसार महाधिवक्त्यांना विशेषाधिकार दिला आहे
◆ घटनेच्या कलम 194 नुसार महाधिवक्त्याने राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही समितीत केलेल्या कोणत्याही वक्तव्याच्या किंवा त्याने केलेल्या कोणत्याही मतदानाच्या बाबतीत , कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीस तो पात्र होणार नाही .
◆ राज्य विधानमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार त्याला उपभोगता येतात .
3 ) आपली अधिकृत कर्तव्ये पार पाडताना त्याला राज्यातील कोणत्याही न्यायालयात सुनावणी घेण्याचा अधिकार आहे
4 ) महाधिवक्त्याला आपल्या कार्यकाळात किंवा निवृत्तीनंतर खाजगी व्यवसाय ( वकीली ) करण्याचा अधिकार आहे . परंतु त्याला सरकारच्या विरोधात युक्तिवाद करण्याचा अधिकार नाही
❖ महाधिवक्ता कार्य व कर्तव्य
1 ) शासनाचा सल्लागार म्हणून कायदेविषक प्रश्नासह ज्या बाबींवर त्यांच्याकडे सल्ला मागण्यात येईल अशा कायदेशीर बाबींवर शासनाला सल्ला देणे
2 ) राज्यपालाने मागितलेल्या दिवाणी किंवा फौजदारी कायदेशीर बाबीसंबंधी त्यांना सल्ला देणे
3 ) शासनाकडून फर्मविण्यात येईल तेव्हा उच्च न्यायालयाच्या मूळ आणि अपील न्यायशाखांमध्ये दाखल केलेल्या खटल्यांमध्ये - मग ते दिवाणी खटले असोत किंवा फौजदारी खटले तेथून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलांमध्ये राज्य सरकारची बाजू मांडणे
4 ) राज्य सरकार विरोधात इतर राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकांमध्ये, ज्या ज्या वेळी शासन त्याला उपस्थित होण्यास सांगेल , त्या त्या वेळी शासनाच्या किंवा त्याच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित राहणे
5 ) संविधानाच्या 228 व्या अनुच्छेदान्वये उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेल्या कोणत्यही खटल्यात, मग तो दिवाणी किंवा फौजदारी असो, शासनाकडून फर्मविण्यात आल्यास शासनाच्या वतीने उपस्थित राहणे
क्र | महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य | वर्ष ( कार्यकाळ ) |
---|---|---|
👤 | ईस्ट इंडिया कंपनी काळ | |
1 | एस.एम. थ्रिप्लंड | 1807 |
2 | एम.जे.मॉकलीन | 1810 |
3 | ऑलिएट वुडहाऊस | 1819 |
4 | जी.सी.इरवीन ( हंगामी ) | 1822 |
5 | जॉर्ज नॉर्टन | 1923 |
6 | ए.हॅमॉन्ड | 1827 |
7 | रिचर्ड ब्रिजमन | 1828 |
8 | जेम्स देवर | 1828 |
9 | जे.मील ( हंगामी ) | 1832 |
10 | एच.रोपर | 1832 |
11 | ऑगस्टस लेमेस्सुरीयर | 1833 |
12 | डब्ल्यु. हावर्ड ( हंगामी ) | 1840 |
13 | एस.एस.डिकिंशन | 1852 |
14 | मायकेल वेस्टरोप ( हंगामी ) | 1856 |
👤 | ब्रिटिश काळ | |
15 | आर्थर जेम्स लुईस | 1857 |
16 | मायकेल वेस्टरोप | 1861 |
17 | लिटलटन बेले | 1866 |
18 | जेम्स व्हाइट | 1869 |
19 | जे.एस.विट ( हंगामी ) | 1870 |
20 | ए.स्कोबल | 1872 |
21 | सी.मॅंह्यू ( हंगामी ) | 1872 |
22 | जॉन मारीयोट ( हंगामी ) | 1877 |
23 | फ्रांसिस लेथम ( हंगामी ) | 1884 |
24 | सी.फरान ( हंगामी ) | 1884 |
25 | जे.जे.जरडीन ( हंगामी ) | 1984 |
26 | एम.एच स्टर्लिंग | 1886 |
27 | जे.मॅकफरसन ( हंगामी ) | 1890 |
28 | बसील लँग ( हंगामी ) | 1892 |
29 | बसील स्कॉट ( हंगामी ) | 1899 |
30 | बी.रेकिस ( हंगामी ) | 1905 |
31 | जी.आर ( हंगामी ) | 1906 |
32 | आर.एम.ब्रान्सन ( हंगामी ) | 1908 |
33 | रॉबर्टसन ( हंगामी ) | 1908 |
34 | माल्कम जारडीन ( हंगामी) | 1908 |
35 | थॉमस स्ट्रँगमन | 1908 |
36 | डी.एन.बहादुरजी ( हंगामी ) | 1915 |
37 | जेमशेदजी कांगा ( हंगामी ) | 1922 |
38 | भुलाबाई देसाई ( हंगामी ) | 1926 |
39 | सर.डी.एम.मुल्ला ( हंगामी ) | 1922 |
40 | डी.बी.बिंग ( हंगामी ) | 1928 |
41 | व्ही.एफ.तारापोरवाला ( हंगामी ) | 1931 |
42 | केन्नट केम्प | 1935 |
43 | एम.सी.सेटलवाड | 1937 |
44 | नोशीरवांजी इंजीनीअर ( हंगामी ) | 1942 |
45 | सी.के.दप्तरी ( हंगामी ) | 1945 |
👤 | स्वातंत्र्योत्तर काळ | |
46 | एम.पी.अमीन ( हंगामी ) | 1948 |
47 | एच.एम.सेरावई | 1957 |
48 | आर.डब्ल्यु. अदीक | 1974 |
49 | आर.एस.भोन्साली | 1978 |
50 | ए.एस.बोबडे | 1980 |
51 | ए.व्ही.सावंत | 1982 |
52 | व्ही.आर.मनोहर | 1991 |
53 | टी.आर.अंध्यारुजीना | 1993 |
54 | सी.जे.सावंत | 1995 |
55 | जी.ई वाहनवटी | 1999 |
56 | व्ही.ए.थोरात | 2004 |
57 | आर.एम.कदम | 2005 |
58 | डी.जे.खंबाटा | 2012 |
59 | एस . व्ही मनोहर | 2014 |
60 | ए. सी.सिंग ( हंगामी ) | 2015 |
61 | एस.जी.अणे | 2015 |
62 | रोहीत देव | 2016 |
63 | आशुतोष कुंभकोणी | 2017 |
64 | बिरेंद्र सराफ | 2022 |